एप्रिल 6, 2019
552
0
बस स्थानकात भरविल्या जाणाऱ्या ‘एसटीविश्व’ या एसटी प्रदर्शनाच्या संकल्पनेला अनुसरूनच रेल्वेच्या धर्तीवर चालत्या फिरत्या प्रदर्शनाची संकल्पना आम्हा एसटीप्रेमींच्या डोक्यात आली असताना, स्वतः परिवहन मंत्री यांनी यास दुजोरा देत आम्हास एसटीची एक विशेष बस खास प्रदर्शनासाठी देऊ केली आणि या चालत्या फिरत्या प्रदर्शनाची अनोखी अशी संकल्पना सातत्यात आणण्यास खुप मोठे सहकार्य केले.
२०१६ साली सप्टेंबर महिन्यात गणपती सणाच्या मुहूर्तावर मुंबईमध्ये सदरच्या प्रदर्शन बसचे उद्घाटन परिवहन मंत्र्यांच्या हस्ते करून या चालत्या फिरत्या प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि एसटीचे विश्व उलगडून दाखवणारा हा रथ म्हणून “एसटीविश्व रथ” या अनोख्या संकल्पनेचा उदय झाला.
गणपती सणाच्या काळात मुंबुईतील विविध भागात सदर रथ फिरवल्यानंतर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, ठाणे या जिल्ह्यात देखील सदर प्रदर्शनाचे यशस्वीरीत्या आयोजन केले गेले.
बस स्थानकात सदर प्रदर्शनाची बस संपूर्ण दिवसभर उभी करून त्याद्वारे एसटीची माहिती लोकांना आम्ही देऊ करत असतानाच, शाळकरी मुलांनी यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला हे विशेष !
दिवसाला तब्बल ४००० ते ५००० विद्यार्थी प्रदर्शनास भेट देऊन एसटीची कुठेही एकत्रितपणे न मिळणारी माहिती संकलित करत होते आणि त्या माहितीचे प्रोजेक्ट रिपोर्ट देखील बनवत होते हे विशेष !
अनेक जत्रा/यात्रा, आर्ट फेस्टिवल, स्वागत यात्रा/ शोभा यात्रा यामध्ये देखील आम्ही या रथाचा समावेश करून एसटीच्या महतीचा जगार हा अगदीच अनोख्या पद्धतीने करत असतो.
प्रदर्शनासाठी एका विशेष अश्या नव्या वातानुकुलीत बसेसचे नियोजन आम्ही भविष्यात करत असून, सदर बसेसद्वारे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे, तालुके, गावे इ. भागात एसटीची माहिती पोहोचविण्याचा आमचा मानस आहे.
सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व सांगणारा हा ‘एसटीविश्व रथ’ भारतातील पहिला अनोखा रथ आहे, हे आम्हाला आवर्जून नमूद करावेसे वाटते.
.
Add Comment