संस्थेची गरज

एसटीप्रेमींच्या छंदातून तसेच एसटीवर भरभरून प्रेम करणाऱ्या उत्साही मंडळींपासून स्थापन झालेल्या या संस्थेच्या प्रवासाची रोमांचकारी माहिती आपण या संकेत स्थळावरील ‘संस्थेविषयी’ या भागातून घेतली आहेच, पण त्याही व्यतिरिक्त या संस्थेची नेमकी गरज काय.? सदर संस्था स्थापन करण्यामागचा नेमका उद्देश काय.? या संस्थेने परिवहन सेवेच्या सक्षमीकरणात असा नेमका बदल होणार आहे.? एसटीला नेमका कसा फायदा होणार आहे.? याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे खाली दिलेल्या मुद्द्यांवरून सदरच्या संस्थेची नेमकी गरज काय आहे, हे आपल्याला अधिक स्पष्ट होऊ शकेल.  

st-pradarshan-msrtc

छंदाचे रूपांतरण विधेयक कार्यात :

मुळात छंद ही एक अशी गोष्ट आहे की जी माणसाला कसे जगावे याची प्रेरणा देते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोजचे जीवन जगत असताना हे छंदच व्यक्तीला सर्जनशील करते आणि माणूस क्रियाशील होतो आणि म्हणूनच माणसाला कोणता ना कोणता छंद हा असावाच जेणेकरून त्याच छंदामुळे माणूस सतत आनंदी राहून त्याच्या मनाला विलक्षण समाधान लाभते.
एसटीप्रेमींचे देखील असेच आहे. छंदाच्या अनेक परिभाषा असताना त्या परिभाषेत आता एसटीप्रेमी ही सज्ञा रुजू पाहत आहे आणि ती नुसतीच रुजली नसून, त्यास व्यापक असा दृष्ट्कोन देखील मिळाला आहे.
त्यामुळे या छंदाला जागून आणि त्याचे महत्त्व जाणून, त्यास व्यापक आणि सकारात्मक दृष्टीकोन देऊनच Bus For Us Foundation ची स्थापना झाली आहे. कोणत्याही वयाची अट नसलेल्या सदरच्या समुहात नाना प्रकारची माणसे.
कुणी आर्किटेक्ट, कुणी इंजिनीअर तर कुणी डॉक्टर.! पण यासर्वांत समान धागा म्हणजे एसटी !
कुणाला एसटीचा प्रवास आवडतो, तर कुणाला एसटीची बस आवडते. कुणाला तासनतास थांबून एसटीच्या बसेसचे फोटो काढायला आवडतात, तर कुणाला त्याच बसचे चित्र काढायला आवडते…. असे एक ना अनेक हौशी मंडळी या समुहात सामावले असून आमच्या या अनोख्या छंदाची प्रचीती आज आम्ही एकमेकांना देत आहोत.
कधी वाटले देखील नव्हते, की एसटीप्रेमी या संज्ञेला एवढा व्यापक दृष्टीकोन लाभेल आणि त्याच रूपांतरण अश्या संस्थेमध्ये होईल. पण म्हणतात ना, निस्वार्थ केलेल्या कामाचे फळ हे कधी ना कधी मिळतेच आणि तसेच झाले. आमचा हा अनोखा छंद हा केवळ आम्ही आमच्या पुरता मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग प्रवासी आणि त्या अनुषंगाने एसटीस व्हावा या उद्देशाने अनेक उपक्रम जसे जमेल तसे राबवायला सुरु केले आणि त्यास भरभरून प्रतिसाद लाभला तो प्रवासी वर्गाचा !
एसटीचा सुरुवातीपासून ते आतापर्यंत संपूर्ण इतिहास सांगणाऱ्या “एसटीविश्व” प्रदर्शनाने तर संपूर्ण महाराष्ट्रभर तर कल्लाच केला. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे इ. जिल्ह्यात एसटीविश्व प्रदर्शने केली गेली आणि त्यास अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.
   ‘ग्रीन टुरिझम’ संकल्पना देखील अशीच. एसटीची बस घ्या आणि मनसोक्त कुठेही फिरायला जा ! याशिवाय गर्दी, सणाच्या काळात राबवलेला प्रवासी मित्र कक्ष असो वा, एखाद्या ऑटो एक्स्पोमध्ये मांडलेला एसटीचा स्टॉल असो, अनेक उपक्रम सध्या Bus For Us Foundation संस्था राबवत असून त्याचे स्वरूप हे दिवसेंदिवस अधिक व्यापक होत चालले आहे.
एसटीच्या कोणत्याही विषयावर फोटोग्राफीपासून ते डॉक्युमेंटरीपर्यंत अनेक गोष्टींचा संग्रह BusFor Us Foundation करत आहे.
त्यामुळे आपल्या छंदाला जर आपण एसटीसोबत दुजोरा दिला, तर नेमकं काय काय होऊ शकतं, याची प्रचिती आपल्याला आलीच असेल.
त्यामुळे आपल्याकडे देखील एसटीविषयक अशी काही भन्नाट कल्पना, असेल तर नक्कीच आपण आमच्या या विधायक कार्यात सहभागी होऊ शकता.

एसटी या महत्वाच्या आणि वेगळ्या विषयावर काम करण्याची संधी :

मुळात आपल्याकडे ‘सार्वजनिक वाहतूक सेवा’ हा विषयच उपेक्षित आहे. त्यात एसटी आणि विशेषकरून बस म्हटल की, अनेकांच्या अंगावर काटा उभा राहून ‘हा प्रवास नकोच ?’ असे काही स्वर आपल्या कानावर पडतात.
एकंदरीत या प्रवासी सेवेची जी छबी आज समाजात तयार झाली आहे ती छबी बदलण्याचे काम आज BusFor Us Foundation च्या माध्यमातून होत आहे, हे इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. समाजातील जास्तीत जास्त घटक जो या सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून आहे, अश्या व्यवस्थेचे सक्षमीकरण ही आज काळाची गरज बनली आहे आणि म्हणून एसटी या वेगळ्या विषयावर आज काम करण्यासाठी BusFor Us Foundation ची निर्मिती झाली, असून अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन या माध्यामतून केले जात आहे.
एसटीविश्व प्रदर्शनाद्वारे एसटीची होणारी जनजागृती असो, किंवा ग्रीन टुरिझम द्वारे एसटीच्या किफायतशीर सेवेचा होणारा अनोखा प्रचार असो, अश्या अनेक माध्यमांतून एसटीची ओळख आपल्याला अगदी जवळून होते.
सणवार तसेच गर्दीच्या काळात एसटी प्रशासनाला सहकार्य म्हणून प्रवासी मित्र कक्ष असो किंवा कोणत्याही एक्स्पोमध्ये एसटी हा विषय लोकाभिमुख करणारा स्टॉल असो, यांमधून आपण स्वतः एसटी बनण्याचा अनुभव हा अगदीच वेगळा असतो. हजारो प्रवाश्यांना सामोरे जाताना नेमकी परीस्थिती कशी असते, याची प्रचिती आपल्याला प्रवासी मित्राच्या भूमिकेत असताना २ ते ३ दिवसातच येते. त्यामुळे ३६५ दिवस चौकशी खिडकीवर बसणाऱ्या त्या कर्मचाऱ्याची भूमिका नेहमी काय असते, त्याचा नेमका त्रास काय असतो, हे आपल्याला अगदी जवळून पाहता येते.
एसटीबाबतचे असे एक ना अनेक विषय हाताळताना एसटी ही संस्था नेमकी काय आहे ? तिचे महत्त्व किती अघाद आहे ? तिची कार्यपद्धती कशी आहे ? हे अगदीच जवळून आपल्याला पाहता येते.
याशिवाय एसटीप्रेमींच्या अनेक अभ्यास दौरे देखील एसटीच्या कार्यशाळेत होत असल्याने एसटीची कार्यपद्धती देखील आपल्याला जवळून पाहता येते.
त्यामुळे शाळा, महाविद्यालये तसेच इतर सामाजिक संस्थेचे जिज्ञासु व्यक्ति BusFor Us Foundation चा भाग होऊन एसटीच्या वेगवेगळ्या विषयांवर काम करण्याची संधी मिळवू शकतो.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध विषयांवर काम करत असताना “सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण” या महत्त्वपूर्ण विषयावर काम करण्याची संधी:

आज जर का जागतिक पातळीवर भेडसावणाऱ्या समस्यांपैकी सर्वात महत्वाची समस्या जर कोणती असेल तर ती “पर्यावरणाची होत असलेली हानी” हाच असेल.
पर्यावरणाच्या बिघडत चाललेल्या समतोलास अनेक घटक कारणीभूत असून ते सर्व घटक हे मानवनिर्मितच आहेत, हे शाश्वत सत्य आपणास नाकारून चालणार नाही आणि म्हणूनच आपण निर्माण केलेल्या या घटकांना कमी करून, पुन्हा एकदा पर्यावरणाचे समतोल राखण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे, हे आपण विसरून चालता कामा नये.
पर्यावरणाचे संरक्षण तसेच संवर्धन करण्याच्या दृष्टीने एक ना अनेक उपाययोजना  राबविल्या जात असताना त्यातील ‘सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण’ हा देखील विषय आज जागतिक पातळीवर जोर धरत आहे आणि त्याचे कारण देखील अगदी तसेच आहे.
रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, परिणामी रस्ते अपुरे पडू लागले आहे. ट्राफिकची समस्या तर दिवसेंगणिक वाढतच चालली असून, या सर्व गोष्टींचा परिणाम हा इंधनावर पडत आहे. सध्या इंधनाचा बेसुमार वापर पाहता भविष्यात हेच इंधन लवकर संपण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून इंधनामध्ये अनेक ठिकाणी भेसळीचे प्रमाण वाढले आहे, परिणामी वाहनातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे वातावरण खराब होऊन अनेक छोटी-मोठी शहरे ही धुरक्यांनी (धुके + धुरके) वेढली गेली आहेत आणि त्याचा थेट परिणाम हा माणसाच्या शरीरावर होत असून, श्वसनाच्या अनेक रोगाने त्यास वेढले आहे.
शहरी भागातील हे प्रमाण पुष्कळ असून माणसाचे आयुर्मान हे आता कमी होत चालले आहे, हे आकड्यावरून स्पष्ट दिसते.
रस्त्यावरील वाढती वाहने, इंधनाचा बेसुमार वापर, ट्राफिकमुळे वाया जाणार वेळ, तसेच प्रदुषणामुळे जडणारे अनेक रोग इ. गोष्टींना जर कोणता शाश्वत पर्याय असेल तर तो ‘सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेचे सक्षमीकरण’ हाच आहे.
कोणत्याही शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा ही अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करणे गरजेचे असून, सदर सेवा अधिक दर्जेदार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेची नेमकी काय गरज आहे ? या सेवेची नेमकी काय भूमिका आहे ? तिची गरज नेमकी काय आहे ? पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीकोनातून सदर सेवा कोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते ? इ. गोष्टींना अगदी जवळून पाहण्याची संधी Bus For Us Foundation च्या माध्यामातून आज उपब्ध होत आहे. सध्या आपण ‘एसटी’ या भारतातील सर्वात मोठ्या आणि पहिल्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक संस्थेची माहिती या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रमांमार्फत घेणार असून भविष्यात भारतातील इतर देखील सार्वजनिक प्रवासी वाहतूक संस्थाची माहिती घेऊन ती संकलित करण्याचे प्रयोजन केले आहे.

स्पर्धेच्या युगात एसटीला आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक संस्थेचे महत्त्व हे समाजात पटवून देण्यासाठी, परिवहन संस्थांचा प्रचार आणि प्रसार हा अनोख्या पद्धतीने करण्याचे अनोखे माध्यम:

सध्याचे युग हे डिजिटल युग असून, मार्केटिंग जगताने याचा फायदा घेत मोठी क्रांतीच केलेली आपल्यास पहावयास मिळते. सर्व काही ‘एका क्लिकवर’ या उक्तीप्रमाणे आता माणसाच्या एका हातात विश्व सामावले आहे आणि त्या विश्वात एसटी देखील असावी हेच Bus For Us Foundation चे मुख्य धोरण आहे.
स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण हा आता या शर्यतीत असून काळाप्रमाणे बदलण्याची जणू कुणी सक्तीच केलेली आहे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, त्यामुळे आपल्या सेवेमध्ये वेळोवेळी केलेले बदल आणि समाजात केलेली त्याची जाहिरात याची योग्य सांगड घातली तरच आपण या शर्यतीत निभावू शकतो, नाहीतर त्याचे काय होईल, हे इतर कुणी सांगायची गरज भासत नाही.
वर्षानुवर्षे अविरत सेवा देणाऱ्या आपल्या लाडक्या एसटीला देखील अश्याच अनोख्या पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असून, हे वेगळे माध्यम आज Bus For Us Foundation उभे करू पाहत आहे. गेली अनेक वर्षे एसटीने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रातील अभिसरणाचे काम केले आहे, त्यामुळे समाजातील तिचे महत्त्व हे प्रचंड असून तिच्या सेवेला आज कोणताच पर्याय असू शकत नाही, असे आपणास समजते. पण असे असताना काळाच्या ओघात एसटी मागे पडली आणि सेवेत काळानुरूप बदल न केल्यामुळे गेल्या अनेक वर्षात एसटीने स्वतःचे अनेक प्रवासी गमावले परिणामी एसटीला प्रचंड तोटा होऊ लागला आणि आज देखील एसटी तोट्याच्या चिखलात अडकली आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेचे सक्षमीकरण हा महत्वाचा उद्देश आज Bus For Us Foundation आपल्या उराशी बाळगून असल्यामुळे एसटीच्या अनेक सेवासुविधांचा योग्य तो प्रचार आणि प्रसार करण्याचे काम आज प्रवासी वर्गातून आम्ही करत आहोत. गेल्या काही वर्षात एसटी देखील मोठ्या प्रमाणात कात टाकताना दिसत आहे, प्रवासी सेवेत अमुलाग्र असे बदल करताना दिसत आहे, त्यामुळे सदरच्या सेवेची योग्य अशी जाहिरात प्रवासी वर्गात होणे अत्यंत गरजेचे असून Bus For Us Foundation निरनिराळ्या माध्यातून, उपक्रमांतून एसटीच्या अनेक सेवेचा प्रचार आणि प्रसार निःस्वार्थपणे करत आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील एसटीप्रेमी हे शिक्षण, कला आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आज एसटीचा अखंड जागारच करत आहे, असे आवर्जून नमूद करावेसे वाटते.
तेव्हा तुम्ही देखील तुमच्या कल्पक बुद्धीने आमच्या या अखंड जागरात सामील व्हा !