एप्रिल 7, 2019
571
0
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एसटीप्रेमींनी एसटीची ही आवड जोपासता जोपासता, संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त एसटी बसनेच प्रवास करून एसटीबद्दलची अनेक माहिती या आमच्या प्रवासात गोळा केली आणि याच संकलित झालेल्या माहितीचा उपयोग हा एसटी तसेच प्रवासी वर्गाच्या फायद्यासाठी व्हावा, एसटीचा जनमानसात प्रचार आणि प्रचार हा अधिक व्यापक प्रमाणात व्हावा, या उद्देशाने ‘एसटीविश्व’ या संकल्पनेचा उदय झाला.
बस स्थानकात २ ते ३ फलाट घेऊन, उत्कृष्ट अशी मांडणी करून भरवल्या जाणाऱ्या सदर प्रदर्शनाचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले आणि त्या सर्वांस उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील लाभला.
महाराष्ट्रातील अनेक बस स्थानाकात सदर प्रदर्शन हे यशस्वीरीत्या भरवले गेले असून, एसटी अनोख्या प्रकारे लोकाभिमुख करण्याचा हा प्रवास अद्याप देखील अविरतपणे सुरूच आहे.
२०१६ साली ठाण्यातील खोपट बस स्थानकात या प्रदर्शनाची पहिली मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि त्यानंतर खानापूर, सांगली, मुंबई इ. ठिकाणी सदर प्रदर्शन भरविण्यात आले.
१९४८ ते आजतागायत, एसटीचा असणारा संपूर्ण जिवंत इतिहास सदर प्रदर्शनात मांडण्यात येतो. जुन्या एसटीच्या बेडफोर्ड मॉडेल पासून ते आताच्या शिवशाहीपर्यंतच्या सर्व गोष्टी या चित्रमय, माहिती तसेच मॉडेलच्या स्वरूपात मांडण्यात येत असून, एसटीच्या जुन्या आणि दुर्मिळ गोष्टी देखील प्रदर्शनाचा मुख्य भाग असतात.
महाराष्ट्रातील एसटीची विविध रूपे देखील फोटोच्या माध्यमातून मांडण्यात येत असून, एसटीच्या जुन्या – नव्या सर्व माहितीचा समावेश यामध्ये करण्यात येतो.
सदरच्या अनोख्या अश्या प्रदर्शनाची दखल ही दस्तुरखुद परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष महोदय श्री. दिवाकर रावते यांनी घेतली आणि एका चालत्या फिरत्या बसद्वारे सदर प्रदर्शन हे अधिक चांगल्याप्रकारे लोकाभिमुख करण्याच्या सुचना दिल्या.
बस स्थानकावर भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनासोबतच आता एसटीच्या एका चालत्या बसमध्ये देखील ‘एसटीविश्व’ प्रदर्शन भरवले जात असून, एक एक जिल्ह्यात प्रदर्शनाची बस लोकाभिमुख करून एसटीचा प्रचार आणि प्रसार हा अनोख्या पद्धतीने केला जात आहे.
Add Comment