एसटीप्रेमी ही संकल्पना रुजवणारे अनोखे स्नेह संमेलन अर्थातच ‘वारी एसटीप्रेमींची’

 

मुळातच समाजात असे अनेक जटील विषय आहेत, की ते सोडवताना शासनाचे देखील हाथ हे आखूड पडत असून, असे अनेक विषय हाताळण्यासाठी त्यांना अनेक सामाजिक  संस्थांची गरज लागते आणि अश्या अनेक सामाजिक संस्था वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रचंड प्रमाणात काम करत आहे. लहानमुले, स्त्रिया, अनाथ, एड्सग्रस्त, दिव्यांग, प्राणी, पक्षी इ. अश्या एक ना अनेक विषयांवर काम करणाऱ्या बऱ्याच संस्था आपल्याला पहावयास मिळतात आणि त्या सर्व संस्था समाजाच्या उन्नतीसाठी कोणत्याही नफा-तोट्याचा विचार न करता अविरत काम करत असतात हे विशेष !
एसटी म्हणजेच सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा हा देखील तसाच उपेक्षित विषय. तब्बल ६५ लाख प्रवाश्यांची दररोज वाहतूक करणाऱ्या या एसटीची गरज किती आहे हे आपल्याला आकड्यावरून सहज लक्ष्यात येते, पण तरीही सदर सेवेची सर्वच स्तरावर होत असलेली वाताहात देखील तेवढीच जास्त आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवांचे सक्षमीकरण होण्यासाठी अनेक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे असून, याचा छोटा भाग म्हणून आम्ही एसटीप्रेमी आज आमच्या विविध उपक्रमांतून कार्यरत आहोत आणि त्यातील सर्वात महत्वपूर्ण भाग म्हणजे ‘वारी एसटीप्रेमींची’ !
आपल्यातल्या कुणी एसटीने प्रवास केला नसेल किंवा एसटी हा शब्द माहीत नसेल, हे दुर्मिळच. पण त्यात देखील एसटीविषयी प्रचंड आपुलकी असलेला, एसटीवर निस्सीम प्रेम करणारा आणि तितक्याच ताकदीने तिच्या संवर्धनासाठी झटणारा गट आज समाजात कार्यरत आहे आणि तो गट म्हणजे Bus For Us Foundation.
‘MSRTC Lover’ मराठीत ‘एसटीप्रेमी’ अशी संज्ञा खऱ्या अर्थाने रुजवली ती या समूहाने.
एसटीवर प्रेम केले काय..एकत्र आले काय..आणि सदरच्या आवडीला एका विशिष्ट साच्यात बांधून त्यांला सामाजिक कार्याची जोड दिली काय…. सगळं कसं वाचायला एकदम सोपं जातं, पण तसं अजिबात नाही. या सर्वांना एकत्रित आणून ते साचेबद्ध करण्याचे काम केले ते या ‘वारीने’
आवड-निवड, भाषा, प्रांत, शिक्षण सर्व काही वेगळं असताना आम्ही ज्या समान धाग्यात एकत्र बांधलो तो धागा म्हणजे एसटी आणि त्यावर असणारे आमचे प्रेम आणि त्यातून तयार झाली ही  ‘एसटीप्रेमी’ संज्ञा. विखुरलेले सर्व एसटीप्रेमी वारीच्या निमित्ताने एकत्र येतो आणि एसटीचा प्रेमाचा त्या दिवशी मोठा जल्लोष करतो. प्रत्येकाचे एसटीप्रेम हे नेमके कसे आहे ? त्याने आपले एसटीप्रेम कश्याप्रकारे  जपले आहे ? इ गोष्टींचा अखंड जागर आम्ही त्या दिवशी करतो आणि तो दिवस एकमेकांच्या सहवासात मनसोक्त घालवतो.
  जमल्यास, त्या दिवशी एसटीच्या एका कार्यशाळेला देखील भेट देतो आणि एसटीच्या अंतरंगातील माहिती अगदी जवळून जाणून घेण्याच्या प्रयत्न करतो.
वर्षातून एकदाच येणाऱ्या या सोहळ्यास दुरून येणाऱ्या बऱ्याच लोकांची मांदियाळी असते आणि त्यात वयाची कोणतीही अट नसते हे विशेष.
लहानापासून ते थोरापर्यंत, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत विखुरलेलं सर्व एसटीप्रेमी या निमित्ताने एकत्र आलेले आपल्याला सर्वांना पहावयास मिळतात.
प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी, वनमित्र, पोलीसमित्र इ.च्या गराड्यात ‘एसटीप्रेमी’  देखील संज्ञा रुजली हे श्रेय ‘वारीचे’च !

Add Comment