आमच्याविषयी
Bus For Us Foundation ही फक्त संस्था नसून, एसटीवर असणाऱ्या निस्सीम प्रेमापोटी समाजात वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या हौशी लोकांचा असा समूह आहे, की जिथे कोणत्याही वयाची अट नाही. अट फक्त एकच की तो एसटीप्रेमी असावा.
आमचे कार्य
लहानपणी कधी न कधी आपण एसटीने प्रवास केला असेलच. त्या लालपरीवर सदैव जीव लावणाऱ्या, एसटी या संस्थेविषयी आणि त्याच अनुषंगाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेविषयी कायम आपुलकी ठेऊन तिच्या उन्नतीसाठी तसेच संवर्धनासाठी सदैव तत्पर असणाऱ्या हौशी मंडळींचा हा अनोखा समूह.
आमची सुरुवात
एसटीप्रेमाची आवड तशी लहानपणापासून, पण आमच्या या समूहाचा खरा प्रवास सुरु झाला तो फ्लिकर या फोटो शेअरिंग वेबसाईटपासून. २००७/८ च्या सुमारास फ्लिकर या फोटो शेअरिंग वेबसाईटवर आम्ही निवडक एसटीप्रेमी एसटीचा एक छोटा ग्रुप तयार करून, त्यावर एसटीचे फोटो टाकू लागलो. एसटीच्या फोटोसोबत एसटीचे नंबर, रंग, बस स्थानके, आगार इ. विषयांवर कुतूहलाने माहिती शेअर करू लागलो. आमचा हा प्रवास काही वर्षे फ्लिकरवरच होता. त्यानंतर फेसबुक या समाजमाध्यामाने जोर धरला आणि आम्ही देखील प्रवाहानुसार तिकडे वळलो.
वापरास अत्यंत सोयीस्कर असणाऱ्या फेसबुकवर ‘MSRTC Lovers Group’ नावाने एक ग्रुप तयार करून त्यावर एसटीची माहिती आम्ही शेअर करावयास लागलो.
अनेक वर्ष फेसबुकवर एसटीच्या माहितीची देवाण-घेवाण करत असताना, याच नावाचे एक फेसबुक पेज देखील तयार केले, जेणेकरून एसटीप्रेमींच्या विविध कार्याविषयांची माहिती ग्रुपच्या बाहेर देखील इतर लोकांना कळू शकेल. त्यानंतर इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग माध्यमावर देखील आम्ही आमचा सहभाग दर्शविला आणि सरतेशेवटी Bus For Us Foundation या नावे संस्था रजिस्टर करून आमच्या कार्यास अधिकृत माध्यमाची जोड आम्ही दिली.
आमचा चढता आलेख
अनेक वर्ष एसटीची ही आवड जोपासत असताना अनेक समविचारी मित्रमंडळी जोडले गेले आणि एसटीच्या या अनोख्या छंदाचे रूपांतरण एसटीच्या प्रचार आणि प्रसाराचे एक अनोखे आणि महत्वपूर्ण माध्यम कधी बनले हे आमचे आम्हास समजले नाही.
एसटीप्रेमींचे वार्षिक स्नेह संमेलन, ग्रीन टुरिझम, एसटीविश्व इ. उपक्रम आम्ही या माध्यमातून वर्षभरात राबवत असतो आणि त्यास एसटी महामंडळाचा देखील तितकाच पाठींबा असतो हे विशेष !
आपली एसटी गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहे. समाजतील सर्व घटकांना तिने सामावून घेत असताना, दुर्बल घटकांचा देखील प्रवास हा तिने सुसह्य केला आहे आणि तिचे हेच ऋण आपल्याला कधीही न फेडण्यासारखेच आहे.
हे असे जरी असले, तरी प्रवासी म्हणून या लोकसेवेला सक्षम करून तिचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली सामाजिक तसेच नैतिक जबाबदारी आहे, असे आम्हास वाटते.
आणि म्हणूनच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन या जागतिक पातळीवरच्या प्रमुख विषयाला अनुसरून सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी आम्ही एसटीप्रेमींनी आमच्या या एसटीप्रेमाचे रूपांतरण इतक्या मोठ्या व्यापक पातळीवर करण्याचे ठरवून, आमच्या या छंदाला एसटीच्या प्रचार आणि प्रसाराच्या अधिकृत माध्यमाची जोड दिली आणि जन्म झाला तो Bus For Us Foundation चा !
आमचे उद्दिष्ट
सार्वजनिक वाहतुक सक्षमीकरणासाठी काम करणारी संस्था
अभिप्राय
आमच्या बद्दलचे लोकांचे मत